Shramik Kisan Seva Samitee's

Loknete Shamraoji Peje Arts, Commerce & Science Mahavidyalay

Shiwar Ambere - Ratnagiri

Affiliated to University of Mumbai and Reecognized by Govt. of Maharashtra

Shramik Kisan Seva Samitee's

Loknete Shamraoji Peje Arts, Commerce & Science Mahavidyalay

Shiwar Ambere - Ratnagiri

Affiliated to University of Mumbai and Reecognized by Govt. of Maharashtra

Kisan Vikas Samitee's

Loknete Shamraoji Peje College of Arts, Commerce & Science Shiwar Ambere

Re-Accredited 'A' Grade with CGPA 3.17 by NAAC, ISO 9001 : 2015 Certified, Best College Award, University of Mumbai 2012-13. Affiliated to University of Mumbai

History

प्रारंभापासून…
दि. १७ जून १९९६ हा दिवस लांजा तालुक्यासाठी खराखुरा नवा दिवस… नवे पर्व सुरू करणारा दिवस… उत्सवाचा दिवस… ज्ञानप्रकाशाचा दिवस… अनेकांनी पाहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न त्या दिवशीच्या प्रभातीच्या किरणांनी सत्यात उतरविले. लांजा तालुक्यात कला  वाणिज्य महाविद्यालय सुरू झाले. न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाच्या पदाधिकार्‍यांच्या अथक प्रयत्नातून, असाध्य ते साध्य करण्याच्या इर्षेतून आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याच्या वृत्तीतून एक ज्ञानसंस्कृती निर्माणास सुरुवात झाली. दि.३० मे १९९५ रोजी तत्कालिन युती शासनाचे मुख्यमंत्री नाम. मनोहर जोशी यांनी एक क्रांतिकारक घोषणा केली. महाराष्ट्रातील ज्या तालुक्यात पदवी महाविद्यालयाची सोय नाही, अशा नऊ तालुक्यांत १००% अनुदानावर महाविद्यालय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व मंडणगड या तालुक्यांचा समावेश होता. नाम.मनोहर जोशी यांच्या घोषणेने तालुक्यासाठी शिक्षणाचे नवे दालन सुरू केले.

 लांजा तालुक्यासाठी पदवी महाविद्यालयाची घोषणा झाली आणि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीने हे शिवधनुष्य पेलायचे ठरविले. भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यात खरा पराक्रम आहे.” असे मानणार्‍या ह्या संस्थेने महाविद्यालय मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. संस्थेकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसतानाही संस्था पदाधिकार्‍यांनी सुरूवातीस प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे निधि गोळा करून परवानगीचा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे तत्कालिन उपकुलसचिव श्रीभिऊर्फ काका सरफरे यांनी बहुमोल योगदान दिले, तसेच  श्री.रविंद्र विश्राम माने यांनी प्रयत्न केले. मामुख्यमंत्री मनोहर जोशी व तत्कालिन उच्च शिक्षणमंत्री मादत्ताजी राणे यांची संस्था पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. तसेच तत्कालिन विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय दत्ताजी नलावडे यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीलाच महाविद्यालय मंजूर व्हावे, यासाठी महत्वपूर्ण शिफारस केली. त्यांच्यामुळेच लांजामध्ये महाविद्यालय अस्तित्वात आले. संस्था व लांजावासीय आदरणीय कै. दत्ताजी नलावडे यांची ऋणी आहे.

महाविद्यालय मंजूर होताच आदरणीय कुसुमताई वंजारे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कैनाना वंजारे यांच्या प्रेरणेनुसार आपल्या मालकीची पाच एकर जागा महाविद्यालयासाठी विनामोबदला, विनाअट दिली. आज याच जागेवर कै.नाना वंजारे विद्यानगरी उभी आहे. या महाविद्यालयाची पायाभरणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष माराजाभाऊ लिमये यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. मुंबईच्या पराडकर आणि पाटकर असोसिएट्स या नामांकित आर्किटेक्ट फर्मने इमारतीचा आराखडा तयार केला. त्यानुसार एक भव्य व देखणी वास्तू शिक्षणयज्ञासाठी उभी राहिली.

महाविद्यालय उभे करीत असताना संस्था पदाधिकार्‍यांसोबतच ग्रामस्थ, व्यापारी, ख्यातनाम उद्योगपती, राजकीय उच्चपदस्थ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व्यक्ती, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी व हितचिंतक यांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत केली. याशिवाय अनेक मान्यवरांनी सहकार्याचा बहुमोल हातभार लावला. या सर्वांचे ऋण विसरता येणे अशक्य आहे.

दि, १७ जून १९९६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या इमारतीत प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य असे दोन वर्ग सुरु झाले. नवीन महाविद्यालय असूनही विद्यापीठाच्या नियमानुसार विध्यार्थी संख्येची अट पूर्ण झाली. सुरुवातीच्या ८-१० दिवसानंतर महाविद्यालय संस्थेचे तत्कालीन सचिव मासदानंद देशमुख यांच्या इमारतीत सुरु झाले. सन १९९६ ते ९८ पर्यंतची  तीन वर्षे डी -अडचणींवर मात करीत महाविद्यालय स्थिरस्थावर होत राहिले. विद्यार्थी संख्या व वर्ग वाढत असताना व्यवस्था होणे अत्यंत महत्त्वाचे होते. परंतु ‘तमसो मा ज्योतिर्गमय ‘ हे ध्येय समोर ठेवून प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जात मार्ग शोधले. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून तिसर्‍याच वर्षी स्वतंत्र वास्तू उभी केली. भविष्यकाळाचा वेध घेत महाविद्यालयाने परिवर्तन सुरू  ठेवले. महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेला १०० टक्के अनुदानप्राप्त विज्ञान शाखेची जोड मिळाली आहे. तसेच एम.कॉम. व एम. ए. चा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला आहे. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाची कायम संलग्नता प्राप्त केली असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनांचा लाभ होत आहे.

सध्या विद्यमान  संस्थाध्यक्ष  माजयवंत शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदानाची वाटचाल अखंड सुरु आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक , ग्रामस्थ , कर्मचाऱ्यांच्या एकजुटीतुन महाविद्यालय आकार घेत आहे. अनेकांच्या सहकार्याने स्वप्न साकार होत आहे. महाविद्यालयाने स्थापनेनंतर केवळ सात वर्षात ‘NAAC ‘ कडून ‘ब’ श्रेणी मिळवून आपला दर्जा सिद्ध केला आहे. पंधराव्या वर्षात वाटचाल करतं दुसऱ्या वेळीही ‘NAAC ‘ कडून मूल्यांकन घेऊन ‘ब ‘ श्रेणी प्राप्त केली. तसेच तिसऱ्या वेळी ‘NAAC ‘ कडून मूल्यांकन करून घेऊन ‘अ ‘ श्रेणी प्राप्त केली.

वीस वर्षाच्या वाटचालीत अनेक घडामोडी घडल्या. विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. अनेकांचे आशीर्वाद आणि संस्थेच्या पाठबळावर महाविद्यालयातील प्राचार्य , प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यात अविरत ध्यासातून व कार्यातून महाविद्यालय साकारत आहे. या वाटचालीचा हा छोटासा इतिहास यानिमित्ताने ठेवण्याचा एक प्रयत्न …..!

Scroll to Top